पुणे : बहुजननामा ऑनलाइन – स्वारगेट येथील बस थांब्यावर एका तरुणाला मोबाईल चोरट्यांनी धारधार शस्त्राने वारकरून त्याचा खून करत मोबाईल व रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ त्या दोघांना विरोध केल्याने त्यांनी खून केल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर हा खळबळजनक प्रकार घडला असून, अद्याप त्या चोरट्यांचा शोध लागलेला नाही. नागेश दगडू गुंड (वय 37, रा. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कमलाकर घोडके (वय 29. उमरगा, जि. उस्मानाबाद) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश हा मूळचा तुळजापूर येथील आहे. तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करतो. काही दिवस पुण्यात देखील काम केले आहे. पण सध्या लॉकडाऊन असल्याने तो कुटुंबासोबत गावी आला होता. मात्र त्याला आज बावधन येथून नाशिकसाठी बदली काम मिळाले आहे. त्यामुळे तो पुण्यात पहाटे आला होता. दरम्यान साडे आकरा वाजण्याच्या सुमारास तो येथील स्वारगेट परिसरात आला. बसमधून उतरल्यावर तो कोथरूडकडे फिर्यादी मित्र याच्या घराकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबला होता. पण बस नसल्याने त्याने मित्राला फोन करून बोलावले. यामुळे फिर्यादी हे घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र त्याचवेळी मोपेडवरून दोन चोरटे त्याच्याजवळ आले. त्यांनी नागेश याचा मोबाईल आणि पैसे पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध केल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या मांडीवर धारधार शस्त्राने वार केले.
यानंतर चोरट्यांनी त्याच्या खिशातील रोकड आणि मोबाईल चोरून नेला. दरम्यान फिर्यादी मित्र हा त्याला नेण्यासाठी आला असता त्याला बस स्टॉपवर त्याची पिशवी दिसली. त्याने पाहिले. पण तो दिसला नाही. त्याच वेळी नागेश याने अंधारातून आवाज दिला. फिर्यादी जवळ गेल्यानंतर त्यांना नागेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने तात्काळ स्वारगेट पोलिसांना याची ठाण्यात जाऊन माहिती दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला रुग्णालयात नेले. पण नागेश याचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे या मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ आणि त्यांची वाढणारी दशहतीने प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. साडे आकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट सारख्या चौकात मोबाईल चोरटे वार करून लूटत असतील तर शहराची परिस्थिती काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.