पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील लक्ष्मी रोडवरील चप्पल व्यावसायिकाची दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाडेगाव (ता. खंडाळा) येथे नेऊन हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. चंदन कृपालदास शेवानी ( वय- ४७, रा. पमार पॅरेडाईज, सेंट्रल बिल्डिंग जवळ, पुणे-१४) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्याला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या घटनेने पुणे शहरासह, लोणंद, पाडेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘शिवकला’ या चप्पल दुकानाचे मालक चंदन कृपालदास शेवानी हे शनिवारी (दि. ४) रात्री साडे दहाच्या सुमारास दुकान बंद करून मंडईजवळील स्वामी समर्थ मठात गेले होते तेथुन ते आपल्या फियाट कारमधून त्यांंचे घरी जात होते. शेवानी हे संगम पार्क, मालधक्का चौक, दु्र्गा रेस्टॉरंट / स्टार ईव्हेंट कंपनी समोरून जात असताना त्यावेळी अज्ञात इसमांंनी दोन कोटीच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करून त्यांचे छातीवर व मानेवर अग्नी शस्त्रासारखे हत्याराने गोळीबार करून तसेच धारदार हत्याराने चंदन शेवानी यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खुन केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात इसमांनी चंदन शेवानी यांचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील पाडेगांव (ता.खंडाळा) गावातून वाहत असलेल्या नीरा उजव्या कालव्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून दिला. अशी फिर्याद चंदन शेवानी यांचे बंधू गोविंद कृपालदास शेवानी (वय-५७, रा. वानवडी, पुणे-४०) यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांत दिली आहे. लोणंद पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात भादंवि कलम ३०२, ३६४, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान रविवारी (दि.५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या नीरा गावापासून सुमारे तीन कि.मी. असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाडेगांंव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती गावकऱ्यांनी लोणंद पोलिसांना दिली. त्यानंतर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून आले. तर अंगावर तीक्ष्ण हत्याराच्या खुणा असल्याचे समोर आल्यानंतर खून झाल्याचे समजले. त्यानंतर सातारा पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण तसेच मुंबई आणि लोणावळा पोलिसांना संपर्क करून अनोळखी मृतदेह सापडला असून मिसिंगबाबत चौकशी केली. त्यानंतर दुपारी पुण्यातील चप्पलचे व्यापारी चंदन शेवानी यांचा मृतदेह असल्याचे समजले. त्याबाबत शनिवारी रात्री साडे दहा वाजता शेवानी यांना त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी शेवानी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
या घटनेची माहिती मिळताच साताराचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हा पुढील तपासाकरिता बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणेला वर्ग करण्यात आला आहे. या खुनाचे गुढ कायम असून याबाबत पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.