पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीमुळे मागिल वर्षी लॉकडाऊन, त्यानंतर अनलॉक आणि यावर्षी कडक निर्बंधामुळे हजारो केशकर्तनालय चालकांचे तसेच कारागिरांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. व्यवसाय बंद असल्याने उत्पन्न नाही. थोडीफार पुंजी होती, तीही संपली आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करता येईनात, उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून आर्थिक मदत (पॅकेज) मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अशी आर्जवी मागणी कारागिरांकडून होऊ लागली आहे.
केशकर्तन हा एकेकाळी पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, त्याला आता व्यापक व्यावसायिक स्वरूप आले आहे. केशकर्तनालयांचा चेहरामोहरा बदलला आहे. पुणे शहर आणि उपनगरांमधील केशनकर्तनालयांमध्ये हजारोंच्या संख्येने कारागिर आहेत. बहुतांश कारागिर बाहेरून आलेले आहेत. या सर्वाचे हातावर पोट आहे. दिवसभर जितके काम होईल, त्याच प्रमाणात कामगारांना पैसे मिळतात. कडक निर्बंधामुळे केशकर्तनालये बंद आहेत. त्यामुळे कामगारांना पैसे मिळणे बंद झाले आहे. गेल्या वर्षी सहा ते आठ महिने अशा परिस्थितीत पूर्णपणे भरडून निघाल्यानंतर यंदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडीफार पुंजी होती, ती संपली, उसनवारी व कर्ज मिळत नाही. बाहेर पडता येत नाही. दुसरे काम जमत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. अनेकांचे जेवणाचेही हाल होत आहेत. चालक वर्गाला जागेचे भाडे, वीजबिल, पगार, साहित्य खर्च असे अनेक खर्च आहेत. दुकान बंद राहिल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. त्यामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत. याव्यतिरिक्त, दाढी तसेच केस कापण्यासाठी नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत, दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.
हडपसरमधील धनंजय ताठे म्हणाले की, दररोज दाढी करणाऱ्यांची अडचण झाली आहे. अनेकांनी दाढी कोरण्याचे मशीन खरेदी केले आहे. मात्र, हा तात्पुरता उपाय आहे. अनेकांना यंत्र वापरता येत नसल्याने त्यांचे पैसेही गेले आणि दाढी करता येत नाही, असे दुहेरी नुकसान झाले आहे. केशकर्तनालय अनेकांचे अर्थार्जन असलेली आवश्यक सेवा आहे. दुकाने बंद राहिल्याने आमचे हाल होत असून, ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. अन्यथा, आमचे जगणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचे त्यांनी सांगितले.