बहुजननामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम सध्या देशभरात सुरु आहे. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लवकरच कोरोनावरील कोवोवॅक्स ही नवीन लस लॉन्च करणार आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. येत्या जून महिन्यात सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्विट करून दिली आहे.
कोवोवॅक्स या लसीला मान्यता दिल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून 2021 मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा असल्याचे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सध्या देशभरात पुण्यातील सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसींचा वापर सुरु आहे. कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादस्थित भारत बायोटेकने भारत वैद्यकीय संशोधन परिषद आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या सहकार्याने केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय आहे. तर कोविशील्ड लसीसाठीच संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं केले आहे .सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचे उत्पादन करत आहे.