बहुजननामा ऑनलाइन टीम – कोविड-19 च्या संकटामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफ लाईन समजले जाणा-या लोकलचे दरवाजे अखेर सर्वसामान्यांसाठी उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले(Public service in Mumbai ) आहेत. येत्या 1 जानेवारीपासून मुंबईतील लोकलसेवा (Mumbai local) सर्वसामान्यांसाठी खुली केली जाईल, असे विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली मुंबईची लोकलसेवा टप्प्या टप्प्याने सुरू केली जात आहे. सुरुवातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू केली होती. त्यानंतर घटस्थापनेपासून महिलांनाही मुंबईच्या उपनगरीय लोकलचे दरवाजे उघडले होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता.
गेल्या पंधरवड्यात मुंबई आणि परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री वडेट्टीवार यांनी लोकलसेवेबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई आणि राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे आता लोकलसेवा सुरू होण्यामध्ये काही अडथळे आहेत असे वाटत नाही. आता अजून काही दिवस जातील. पण 31 डिसेंबरनंतर जानेवारीमध्ये जानेवारीच्या 1 तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सुरू होऊ शकते, असे ते म्हणाले.