मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली असतानाच, आता आणखी एक परमबीर सिंग यांच्याविरुद्ध १४ पानाची तक्रार थेट पोलीस महासंचालकांकडे दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत तर सिंग हे दिवाळीला प्रत्येक झोनच्या डिसीपीकडून ४० तोळे सोन्याचे बिस्कीट घ्यायचे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याचे बिस्कीटे घेतली आहेत महत्त्वाचे म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी ते दबाव आंत तसे न केल्यास त्या अधिकाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असत असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीमुळे सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी केली असून सध्या ते अकोला नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत.
ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग हे १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ या काळात कार्यरत होते. त्यावेळी भीमराज उर्फ भीमराव घाडगे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. परमबीर सिंग यांनी आपल्यावर अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी दबाव आणला होता, त्यांचं न ऐकल्याची शिक्षा म्हणून आपल्याला अनेक गुन्ह्यात अडकवून अडचणीत आणलं होतं, असंही त्यांनी या तक्रारीत म्हंटल आहे. याशिवाय प्रत्येक झोनच्या प्रत्येक डीसीपीकडून दिवाळीला भेट म्हणून ४० तोळे सोन्याचे बिस्कीट तर सहाय्य्क पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याचे बिस्कीटे घेतल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.
सिंग यांनी त्यांची पत्नी सविता यांच्या नावावर खेतान नावाची कंपनी सुरु केली आहे. त्याचे कार्यालय इंडिया बुल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे तसेच त्या इंडिया बुल या कंपनीचे संचालक आहेत इंडिया बुलमध्ये सुमारे रू.५०००/–करोडची गुंतवणूक केली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचे म्हंटल आहे. सिंग हे ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनी त्यांची पत्नी सविता यांना वापरण्यासाठी सरकारी वाहन नं. एम. एच. ०१- ए. एन १४१५ होंडा सिटी ही कार दिली होती. या कारवर सरकारी वाहन चालकाचा वापर केला जात होता.
त्याबाबत मी शासनाकडे तक्रार केली आहे. त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे सुरू ठवण्यासाठी सिंग हे हस्तकामार्फत दरमहा करोड़ रूपये मिळवत, पोलीस अधिकाऱ्याचे बदल्याल्यासाठीही पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३, कल्याण येथे नियुक्तीस असताना प्रकाश मुथा (रा. कल्याण) त्यांच्यामार्फतीने रिव्हॉल्व्हर लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवुन लायसन्स सिंग देत होते तसेच बिल्डर लोकांचे कामे त्यांच्यामार्फतीने होवुन त्यामध्ये करोडो रूपयाची देवाण घेवाण सेंटलमेंन्ट करून केली जात होती. या त्यांच्या कृत्यामध्ये जो कोणी पोलीस अधिकारी मदत करत नसेल तर त्याचेविरूध्द खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियंत्रण कक्ष येथे केली जात होती. त्यामध्ये उदा. पोनि कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझे विरूध्द ५ खोटे गुन्हे नोंदविले होते.
सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांचेकडे बदल्यातील भष्टाचाराच्या रक्कमा जमा केलेनंतर बदल्या केल्या जात होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुक करताना सुमारे १ करोड ते ५० लाख रूपये घेतल्याशिवाय बदल्या केल्या जात नव्हत्या अशा दावाही त्यांनी केला आहे. गुन्हयातील गर्भश्रीमंत आरोपीचे नावे गुन्हयातुन काढून टाकण्याचे बेकायदेशीर आदेश सिंग यांनी मला दिले होते. परंतु त्याला मी नकार देताच त्यांनी माझेविरूध्द खोटे गुन्हे नोंदविल्यानंतर मला निलंबित केलेनंतर माझेकडील तपासास असलेल्या गुन्हयातुन गर्भश्रीमत आरोपीची नावे काढून टाकली व काही गुन्हे क समरी करण्यात आले त्यामध्ये सुमारे २०० कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे, असे घाडगे यांनी म्हंटले आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग दोन शासकीय निवासस्थानांचा बेकायदेशीरपणे वापर करीत होते. याबाबत, मी तक्रार केल्यानंतर त्यांनी एकूण २९,४३,८२५/- एवढी रक्कम भरणा केल्याचेही घाडगे यांनी या तक्रारीत म्हंटले आहे. या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, सिंग यांना केवळ दोन कुक व एक टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची परवानगी होती. मात्र, त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत ठाणे येथील निवासस्थानी एस.आर.पी.एफ.चे ६ पोलीस कर्मचारी आणि ठाणे येथील नेमणुकीतील १४ पोलीस कर्मचारी सेवेसाठी वापरत होते.
तसेच मुंबई येथील निवासस्थानी त्यांचे कुटुंबाकरिता एस. आर. पी. एफ. चे १० पोलीस कर्मचारी आणि ३ वाहन चालक पोलीस हवालदार पठारे आणि पोलीस हवालदार पाटील यांचा वापर करत होते. परमबीर सिंग यांच्यासोबत गेल्या २० वर्षांपासून पोलीस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा आणि पोलीस हवालदार प्रशांत पाटील हे दोघे आहेत त्यांची कोठोही बदली झाली तरी हे दोघे त्यांचाबरोबरच आहेत. खासगी व्यवहारासाठी व बदल्यामधील भ्रष्टाचाराच्या रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्याची या दोघांकडे जबाबदारी असल्याचेही भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.