बहुजननामा ऑनलाइन टीम – उद्योगनगरीतील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनेनंतर पोलिसांनी तब्बल 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले.(cases of burglary) त्यानंतर तीन दिवस सापळा रचून पोलिसांनी दोघा सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून10 लाखांचे सोने आणि 2 लाख 60 हजारांच्या दुचाकी असा 12 लाख 60 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. शहरात एकूण 15 ठिकाणी सोनसाखळी हिसकावून चोरी आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय 26 रा. आनंदनगर, चिंचवड), अल्ताफ सलीम शेख (वय 19, रा. हांडेवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. आरोपी प्रभाकर दोडमनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहर, पुणे रेल्वे, कर्नाटक आदी ठिकाणी जबरी चोरी, वाहन चोरी, असे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर उद्योगनगरीत सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक असे चार पथक तयार केले. सोनसाखळी चोरीच्या घटनांचा चारही पथकांकडून आढावा घेतला. 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यावरून आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गांचा आढावा घेऊन तीन दिवस सापळा रचण्यात आला.
दरम्यान पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, चिंचवड, पिंपरी परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी आरोपींना चिंचवड येथून ताब्यात घेतले. खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कारवाई केली.