पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मध्यंतरीच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. रुग्ण संख्या वाढत असताना सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला होता. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 623 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 623 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 48 हजार 345 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 882 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 38 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 5 हजार 650 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 25 रुग्ण शहरातील आहेत. तर 13 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.25) शहरामध्ये 65 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात 4105 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 45 वर्षावरील 3402 तर 703 हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाइन वर्कर यांना लस देण्यात आली. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 84 हजार 432 जणांना लस देण्यात आली आहे.