पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. रुग्ण कमी होत असताना शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 590 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 590 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार 722 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 869 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 37 हजार 846 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 5 हजार 934 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 26 रुग्ण शहरातील आहेत. तर 14 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.24) शहरामध्ये 08 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात 857 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 80 हजार 327 जणांना लस देण्यात आली आहे.