पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – 31 डिसेंबर 2020 च्या रात्री मद्यपान करून वाहने चालवीत स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या 80 वाहनचालकांवर पिंपरी चिचंवड पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय 55 प्रतिबंधात्मक आणि 3 हजार 340 जणांवर चलन कारवाई करण्यात आली आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अपघातांमध्ये मद्यापान करुन वाहने चालवणाऱ्यांमुळे अपघात होत आहेत. यामुळे गंभीर अपघात होऊन संबंधित वाहनचालकासह इतरांचा जीव देखील जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आढळून आल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाई केली जाते.
31 डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. पकडण्यात आलेल्या वाहन चालकांकडून पोलिसांसोबत हुज्जत घालून आपण मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले जाते. अशा वाहनचालकांची रक्ताची चाचणी करून त्यात अल्कहोलचे प्रमाण तपासण्यात आले. यामध्ये अल्कहोलचे प्रमाण दिसून येणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई केली आहे.
पिंपरी चिचंवड पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी 80 तळीरामांवर कारवाई केली आहे. यामध्ये निगडी -19, आळंदी – 7, वाकड -3, चिखली-1 अशा 30 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. तर वाहतूक पोलिसांनी 50 जणांवर कारवाई केली. याशिवाय भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 5, भोसरी 3, आळंदी 1, दिघी 1, हिंजवडी 39, देहूरोड 2, शिरगाव 2 आणि म्हाळुंगे 2 अशा 55 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक पोलिसांनी चलन कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी 3 हजार 292 जणांवर चलन कारवाई करून त्यांच्यावर 12 लाख 78 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये भोसरी एमआयडीसी 2, भोसरी 9, चिंचवड 3, वाकड 4, हिंजवडी 6, चिखली 4, रावेत 20 अशा एकूण 48 कारवाया पोलीस स्टेशन स्तरावर करण्यात आल्या आहेत.