नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – सुरक्षा कर म्हणून दरमहा 10 कोटी तसेच प्रतिमाह 5 कोटी रुपये द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व महत्वाची शासकीय कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्या एका माथेफिरुला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्धापूर (जि. नांदेड) येथून रविवारी (दि. 23) अटक केली. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शेख अब्दूल रफिक अब्दूल रऊफ असे अटक केलेल्या माथेफिरुचे नाव असून तो उच्च विद्याविभूषीत आहे. त्याने एम.एससी कॉम्प्युटर पूर्ण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेल आयडीवर धमकीचा मेल आला होता. हा मेल मराठी भाषेत शब्दात लिहिला होता. यात पैशाची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जिल्ह्यातील सर्व महत्वाची कार्यालये उडवून देऊ असा इशारा दिला होता. 125 बॉम्ब फुटायला तयार आहेत, असे म्हणत सोबत 132 ठिकाणांची यादी जोडली होती.
बॉम्बची क्षमता एक कि.मी. असल्याचे मेलमध्ये नमूद केले होते. नांदेडमध्ये कोट्यवधीची मालमत्ता आणि अमूल्य जीव धोक्यात आहेत, वेळेत निर्णय घेतला नाही तर सर्व नष्ट होईल, आम्हाला सामान्य लोकात भय पसरवायचे नाही. जोपर्यंत पैसे येतील तोपर्यंत हे गोपनीय राहील असे पत्रात म्हटले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या संदर्भात तज्ञांशी संपर्क साधून माहिती घेतली, तसेच या मेलचा बारकाईने अभ्यास केला. तपासात हा मेल नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथून आल्याची खात्री पटताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे.