बहुजननामा ऑनलाईन : बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या सेवाकाळातून 5 महिने अगोदरच स्वेच्छा निवृत्ती म्हणजे व्हीआरएस घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सुशांत सिंह राजपूत केसमुळे चर्चेत आलेले गुप्तेश्वर पांडेय यांच्या या पावलानंतर आता त्यांचा राजकारणातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी गुप्तेश्वर पांडे यांनी सेवानिवृत्तीपूर्वी 5 महिने अगोदरच नोकरी सोडली आहे, ज्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवतील, असा जो अंदाज वर्तवला जात होता त्यास बळ मिळाले आहे. ते बक्सर जिह्यातून विधानसभा निवडणूक लढवतील असा अंदाज आहे.
निवृत्तीच्या एक दिवस अगोदरच गुप्तेश्वर पांडे बक्सरला गेले आहेत, जेथे सिव्हिल ड्रेसमधील त्यांचे बक्सर जिल्हा जेडीयू अध्यक्षांसोबतचे एक छायाचित्र वायरल झाले होते. मात्र, त्यांनी हे छायाचित्र राजकारणाशी जोडू नये असे म्हटले होते. परंतु, ते सोशल मीडियामध्ये वायरल झाल्यानंतर एका दिवसातच त्यांनी व्हीआरएस घेतला.
गुप्तेश्वर पांडेय बक्सर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मुन्ना तिवारी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे. 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या सेवाकाळात दुसर्यांदा राजीनामा दिला आहे. ते यापूर्वी अनेक जिल्ह्यांचे एसपी आणि डीआयजी होते, तसेच मुजफ्फरपुरचे झोनल आयजी सुद्धा होते.
बिहारचे डीजीपी म्हणून त्यांनी 2019 खुर्ची सांभाळली. ज्या पद्धतीने गुप्तेश्वर पांडेय यांचा व्हीआरएस सरकारने मंजूर केला आहे, ते पहाता ते राजकारणात येण्याची घोषणा ही औपचारिकता असल्याचे म्हटले जात आहे. गुप्तेश्वर पांडेय यांनी यापूर्वी सुद्धा 2009 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, परंतु लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने त्यांनी तो माघारी घेतला होता.