बीड: Pankaja Munde | बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Sharad Pawar NCP) बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षण (Maratha Reservation Andolan) हा बीडमध्ये कळीचा मुद्दा ठरल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये होत आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपने म्हणजे सत्ताधारी पक्षांनी घेतलेली भूमिका लोकापर्यंत सकारात्मक गेली नाही, आणि त्याचा मोठा परिणाम पंकजा मुंडे यांच्या पराभवात आहे. तसेच राज्यातील फोडाफोडीचे राजकारण मतदारांना रुचलेले दिसले नाही. या निवडणुकीत तर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेंचीही (Dhananjay Munde) मोठी साथ मिळाली.
बीड जिल्ह्यात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात गेवराई, बीड, केज या ठिकाणी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळाले तर परळी, माजलगाव, आष्टी या गावात महायुतीच्या (Mahayuti) पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळाले.
सहापैकी पाच विधानसभांवर महायुतीचे आमदार तर बीड या एकाच विधानसभेत शरद पवार गटाचा आमदार आहे. बजरंग सोनवणे यांना बीडमधून लीड मिळाली आहे तर परळीतून पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. बीड आणि गेवराई या विधानसभा जागांवर पंकजा मुंडेंना मोठा तोटा सहन करावा लागला.
त्यातही गेवराई या विधानसभेत भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत. मात्र त्यांना फारशी मतं खेचून घेता आली नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना सर्वात कमी मते मिळाली.
अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. यामुळे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तो आपल्या बाजूने करण्यात बजरंग सोनवणे यांनी यश मिळवलं. त्याचाच परिणाम आपण बघतोय की बजरंग सोनवणे हे खासदार झाले.