पुणे : – Padmashri Prema Purao Passes Away | सामाजिक कार्यकर्त्या, स्वातंत्र्यसैनिक आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापीका प्रेमा पुरव यांचे आज (मंगळवार) पुण्यात निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमा पुरव यांच्या निधनानंतर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पद्मश्री प्रेमा पुरव यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३५ रोजी गोव्यात झाला. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आपला भाऊ काशिनाथ याच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. ब्रिटिशांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या त्यांनी पायावर झेलल्या. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या कार्याबद्दल ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थे’ने (AIWEFA) २००२ मध्ये स्त्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच 2002 मध्ये भारत सरकारने पद्मश्री हा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. 2020 साली सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने प्रेमा पुरव यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रेमा पुरव यांनी गोवा मुक्ती-आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पोर्तुगीज राजवट संपुष्टात आणून गोवा मुक्त करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, हे सांगण्यासाठी दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळात प्रेमा पुरव यांचा समावेश होता. गोवा मुक्त झाल्यानंतर प्रेमा पुरव यांनी आपले सारे आयुष्य महिलांना उद्योगिनी बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या कार्यात झोकून दिले. त्यांची जन्मभूमी गोवा आणि कर्मभूमी महाराष्ट्र राहिली.
महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी सुरुवातीस काही महिलांना बरोबर घेऊन १९७५ मध्ये ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ची स्थापना केली आणि ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली. १९८२ मध्ये गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व संपानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. तेव्हा कामगारांच्या घरातील स्त्रियांना खाणावळ चालवण्यासाठीचे स्वयंपाकशास्त्राचे धडे द्यायला त्या पुढे सरसावल्या.
प्रेमा पुरव यांनी स्थापन केलेल्या ‘अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी मर्यादित’ या सोसायटीमार्फत स्वयंरोजगारासाठी गरजू महिलांना आणि पुरुषांना संयुक्त जबाबदारीवर विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच छोटा व्यवसाय, शिक्षण, घर दुरुस्ती, जुने कर्ज फेडणे यासाठी सूक्ष्म कर्ज (मायक्रो फायनान्स लोन) दिले जाते.