नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा धोका रोखण्याची सर्वात मोठी आशा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लसीमुळे आली आहे. या लसीवर मानवी चाचणी सुरू असून चाचणीमध्ये चांगले परिणाम समोर आले आहेत. भारतातही ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस तयार केली जाईल. ऑक्सफर्ड वॅक्सीन समूहाचे संचालक अँड्र्यू पोलार्ड म्हणाले की, अँटीबॉडी प्रतिसादावरून हे दिसून येते की ही लस अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणाले की, चाचणी यशस्वी झाली असतानाही आता आम्हाला या लसीमुळे कोरोना विषाणूचा बचाव होऊ शकतो याचा पुरावा हवा आहे. पोलार्ड म्हणाले की, आता या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाईल आणि इतर लोकांवर त्याचा काय परिणाम होतो याचे मूल्यांकन केले जाईल.
ते म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात लस तयार करणे आणि ती संपूर्ण जगाला पुरवणे हे एक मोठे आव्हान असेल. अमेरिका आणि चीनमध्येही यावर काही काम चालू आहे का, अशात त्यांच्याशी स्पर्धा आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही हे स्पर्धा म्हणून नाही तर एकत्रित प्रयत्न म्हणून पाहत आहोत. जगातील इतर देशांतील कोविडवरील संशोधनात गुंतलेल्या लोकांसह देखील आम्ही आमचे अनुभव शेअर करतो. त्याचबरोबर भारतात ही लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, आम्ही ही लस मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत आणि या आठवड्यात लसीसाठी परवानगी घेणार आहोत.
ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत आम्ही ऑक्सफर्ड लसीचे ३०० ते ४०० मिलियन डोस तयार करण्यात यशस्वी होऊ. या लसीच्या किंमतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोविडशी संपूर्ण जग संघर्ष करत असल्याने आम्ही त्याची किंमत कमीत कमी ठेवू. सुरुवातीला यावर कोणताही नफा घेतला जाणार नाही. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत १००० रुपयांच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. ते म्हणाले की, संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे लसीची मागणी खूप जास्त असेल. अशा परिस्थितीत त्याचे उत्पादन व वितरण यासाठी आम्हाला शासकीय यंत्रणेची आवश्यकता असेल.