बहुजननामा ऑनलाइन टीम – लखनऊ : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. मात्र, आता या व्हायरसचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सामान्य रुग्णांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना कोरोना रिपोर्ट देणे बंधनकारक नसणार आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता कोणत्याही वैद्यकीय उपचारापूर्वी कोरोना रिपोर्ट मागितला जात होता. जर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर संबंधित रुग्णावर उपचार केले जात होते. मात्र, आता हाच नियम उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतला आहे. त्यानुसार, आता वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर कोरोनापूर्वी जसे उपचार केले जात होते, तसेच यापुढेही उपचार केले जाणार आहेत. म्हणजेच आता उपचारापूर्वी कोरोना रिपोर्ट डॉक्टरांना दाखविणे बंधनकारक नसणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव आलोक कुमार यांनी ट्विट करून दिली.
https://twitter.com/IasAlok/status/1360155182361767940
रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्णय
उत्तर प्रदेशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपूर्वी ज्याप्रकारे उपचार केले जात होते, तशाच प्रकारे म्हणजे कोरोना रिपोर्टशिवाय उपचार केले जाणार आहेत.
हजारो रुग्णांना होणार फायदा
कोरोना काळात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठात उपचार घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने या निर्णयाचा फायदा हजारो रुग्णांना होणार आहे.