मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून भाजप नेत्यांकडून रोहित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कोरोना रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही अन् कोविड सेंटरमध्ये रोहित पवारांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे म्हणत पवारांवर टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी भातखळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. नियमांची गोष्ट कोण करतंय ? भातखळकरजी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता ? यामुळे स्वतःचेच जास्त वांधे होतील, असा पलटवार आमदार पवार यांनी केला.
नियमांची गोष्ट कोण करतंय?
आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी @BhatkhalkarA जी!
उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील! https://t.co/5E6XxHiyEL pic.twitter.com/cbVXSflLGw
— Office Of Rohit Pawar (@RohitPawarOffic) May 26, 2021
आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट केला आहे. 45 वर्षांखालील नागरिकांना कोरोना लस घेण्याची परवानगी नसताना तन्मय फडणवीस याने लस टोचून घेतली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने भाजप अडचणीत आला होता. याच मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.