नवी दिल्ली वृत्तसंस्था – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस निरीक्षकासह अन्य एका सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश मुंबई पोलीस आय़ुक्तांनी दिले आहेत. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या गँगमधील सोहेल भामला याला सोडल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय गोविलकर आणि सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सिंगोटे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या गँगमधील सोहेल भामला याच्याविरोधात लुट आऊट नोटीस काढण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी भामला याला अटक करून कार्यालयात आणले. परंतु चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर सोहेल भारताबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे निष्काळजीपणा केल्याने मुंबई पोलीस आय़ुक्तांनी दोघांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तर त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे.
२००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलीस निरीक्षक संजय गोविलकर हे गिरगाव चौपाटी येथे तैनात होते. त्यावेळी तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडले तर गोविलकर यांनी ईस्माईल याला शुट केले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.