मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एका रिक्षाचालकांने आपल्या मित्राच्या मदतीने प्रवाशी महिलेवर मध्यरात्री धावत्या रिक्षामध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथून मालाडला जाणाऱ्या एक्सप्रेस हायवे रोडवर ही घटना घडली आहे. महिलेने धावत्या रिक्षामधून उडी घेतल्याने अत्याचार टळला असला तरी यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री पावणे एकच्या सुमारास मालाडला जाण्याच्या उद्देशाने रिक्षात बसली. रिक्षामध्ये अगोदरच रिक्षाचालकाचा मित्र बसलेला होता. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर मागे बसलेल्या इसमाने महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला आणि रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, मित्राच्या आदेशाने रिक्षाचालकाने रिक्षा वेगात चालविण्यास सुरुवात केली. अखेर बचाव करण्यासाठी महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारली. यात महिलेच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे. घटनेनंतर रिक्षाचालक आणि त्याचा मित्र तेथून फरार झाले होते. महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि सांगिलेल्या वर्णनानुसार आरोपींचे स्केच तयार केले आहेत. तसेच घटनास्थळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपींना अटक केली आहे.