नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी (दि.15) इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु होती अन् शनिवारी स्वातंत्र्य दिनी धोनीने निवृत्तीची घोषणा केली. धोनीने शनिवारी सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वच चाहत्यांना धक्का दिला. माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार…7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असे समजा, अशी पोस्ट करून निवृत्ती जाहिर केली. मात्र, धोनीने निवृत्तीसाठी 7.29 हीच वेळ का निवडली याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.
फिनीशर उत्कृष्ठ विकेटकीपर म्हणून ओळखला जाणाऱ्या कॅप्टन कूलनं क्रिकेटमधून निवृत्तीही हटके प्रकारे घेतली. धोनीनं शायराना अंदाजात भावुक होत एक व्हिडीओ शेअर केला आहे. मै पल दो पल का शायर हूँ असं म्हणत त्याने पूर्वीपासूनचे फोटोंना कोलाज करत हा व्हिडीओ तयार केला आहे. मात्र 1929 म्हणजे काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. 1929 म्हणजे 7 वाजून 29 मिनिटं. मात्र धोनीनं 7 वाजून 29 मिनिटांनीच का निवृत्ती घेतील ? हा कोणता खास मुहूर्त होता का ? तर तसे काहीही नाही.
10 जुलै 2019 चा तो पराभव जिव्हारी लागला ?
मीडिया रिपोर्टनुसार, 7 वाजून 29 मिनिटांनीच भारत वर्ल्ड कप 2019 मधून न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमधून बाहेर पडला होता. त्याच वेळेला धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. मार्टिन गुप्तीलनं धोनीला आऊट केलं होतं, आणि भारताचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. धोनी बाद झाल्यानंतर भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे कठिण होते. शेवटच्या ओव्हरमध्ये युझवेंद्र चहल बाद झाल्यानंतर भारताचा वर्ल्ड कपमधील प्रवास संपला. त्यावेळी वेळ होती 7.29 मिनिटं. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ग्रॅन्ट एलिअटनं चहल बाद झाल्यानंतर भारत वर्ल्ड कपमधून बाद झाल्याचे ट्विट केले होते.