नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर हास्य चित्रपट बनवणाऱ्या व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विनोद रामाणी असं या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोमवारी पुण्यात राहत्या घरी विनोद यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विनोद नागपूरमधील प्रसिद्ध औषध व्यापारी होते. पोलीस तपासात समोर आले आहे की, कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.
विनोद रामाणी यांचे एपेक्स मेडिकल नावाने पाच दुकानं आहेत. रामाणी यांचा नागपुरातील एक यशस्वी औषध व्यापारी म्हणून लौकिक आहे. रामाणी यांचे एपेक्स मेडिकल स्टोर्स शहरातील सर्वात मोठे औषध विक्रीचे दुकान म्हणून ओळखले जाते. रामाणी यांची पत्नी आणि मुलं बाहेरगावी गेले होते. कीर्ती अपार्टमेंट्समधील फ्लॅटमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मृतदेहाचा वास हळूहळू परिसरात पसरला. यानंतर तेथील स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. यानंतर विनोद रामाणी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.अनेकांना असा प्रश्न पडला की, पाच दुकानं असतानाही आणि औषध विक्रीच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले असतानाही त्यांनी आत्महत्या का केली असावी. पोलीस तपासात समोर आले की, रामाणी यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामाणी यांनी दोन वर्षांपूर्वीच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. हा चित्रपट जेव्हा पूर्ण झाला तेव्हा रामाणी यांना दाऊदच्या लोकांकडून काही सीन्स वगळण्यासाठी धमक्या येऊ लागल्या. रामाणी यांनी याबाबत रितसर पोलीस तक्रारही केली होती. यानंतर त्यांचा चित्रपट रिलीज झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. कॉफी विद दाऊद असं या चित्रपटाचं नाव आहे. या अपयशामुळे रामाणी यांना मोठा तोटा झाला. यानंतर त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला.
विनोद रामाणी हे औषध विक्रीच्या क्षेत्रात यशस्वी व्यापारी होते त्यामुळे त्यांचे यश पाहता त्यांच्यावरील कर्ज ते सहज हाताळू शकत होते. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, एकतर त्यांच्या वरील कर्जाचा बोजा हा प्रचंड असावा किंवा मग त्यांना या कर्जा प्रकरणी धमक्या येत असाव्यात. अशीही शंका व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील जनतेसोबतच पूर्ण व्यापारी वर्गाचे पोलीस तपासाकडे लक्ष लागून राहिले आहे.