बहुजननामा ऑनलाइन टीम – ठाण्याची मराठमोळी तरुणी श्रुतिका माने(Shrutika Mane ) (20 ) ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत प्रथम आली आहे. तीचा जन्म इंग्लंडला झाला असला तरी ठाणे येथे आल्यानंतर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने पुर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्सची पदवीचे शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत होणा-या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे. श्रुतिका ही ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने व डॉ राजश्री माने यांची कन्या आहे.
दरवर्षी ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या 7 स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली. श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. 2001 साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली.
आपल्या यशाबद्दल श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी असल्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता असे ती म्हणाली. तर श्रुतिकाचे वडील डॉ.संदीप माने व आई डॉ राजश्री माने हे आयव्हीएफ स्पेशॅलिस्ट आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून मुली देखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. मुलींच्या कतृत्वाला साथ दिली पाहिजे.