बहुजननामा ऑनलाईन टीम : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी मात्र अजूनही उमेदवारांच्या बाबतीत संभ्रम गोंधळ सुरु आहे. त्यात दुसरीकडे राष्ट्रवादीने करमाळा मतदार संघातील आपल्या उमेदवाराला मतदान करू नका, असं पत्रक काढले आहे. तसेच करमाळ्याबरोबर सांगोल्यातही असाच गोंधळ असल्याने पक्षात आणि मतदारसंघात चिंतेचे वातावरण आहे.
करमाळ्यात संजय पाटील घाटणेकर हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत, तरी देखील अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाटणेकरांऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे संजयमामा शिंदे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत पक्षाने एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे संजय पाटील घाटणेकर यांना अर्ज मागे घेता आला नाही, त्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संजयमामा शिंदे यांना मतदान करावं असं आवाहन पत्रक वाचून केलं आहे. इकडे मात्र राष्ट्रवादीच्या या कारभारामुळे संजय पाटील घाटणेकर चांगलेच संतापले असून अजितदादांना आपला हिसका दाखवून देऊ, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
तिकडे सांगोल्यातही आपला माजी जिल्हाध्यक्ष सोडून शेकापला पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्रवादीने केले आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे यांचा तर दुसराच गोंधळ सुरु आहे. सपाटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचल रॅलीला गुलाबी पाकळ्याच्या पायघड्या घातल्या आहेत, तसेच एवढ्यावर न थांबता एका दिंडोरीच्या बाबाचं भविष्य ऐकूण आपण जिंकणार असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे यासर्व परिस्थितीनिशी राष्ट्रवादी कश्या पद्धतीने मैदानात उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Visit : bahujannama.com