नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊननंतर आता नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. जर नोकरी मिळाली तर ती टिकवणे हेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे देशभरात हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. पण आता या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता फ्रान्सची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) भारतात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे.
कॅपजेमिनीने यावर्षी भारतात तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कंपनीने याबाबत सांगितले, की भारतातील कंपनीच्या अस्तित्वाचा मोठा फायदा घेऊ इच्छिते. भारतात कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी एका मुलाखतीत सांगितले, की नव्या भरतीसह यावर्षी आम्ही कंपनीच्या महसूलात 7 ते 9 टक्क्यांच्या वाढीची आशा करतो. यामध्ये 50 टक्के फेशर्स आणि 50 टक्के लेटरलची नियुक्ती केली जाणार आहे.
भारतात एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी
पॅरिस येथील आयटी कंपनी कॅपजेमिनीसाठी भारत सर्वात कौशल्याचे केंद्र आहे. कंपनीचे एकूण 2,70,000 कर्मचारी काम करत आहेत. मात्र, यामध्ये भारतातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,25,000 आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतात 24,000 लोकांना नोकरी दिली.
डिजिटल स्कील गरजेचे
यावर्षी होणाऱ्या भरती प्रक्रियेत क्लाउड, इंजिनिअरिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, 5G, सायबरसिटी याचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, असे अश्विन यार्डी यांनी सांगितले.