बहुजननामा ऑनलाइन टीम – आता भीमा कोरेगावचा निर्णय पार अमेरिका द्यायला लागली का. आम्ही पण तपास करू शकतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निर्दोष लोकांचे हाल होणार नाही. आम्ही काम करणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून संशोधक रोना विल्सन यांना अटक केली. त्यांच्या लॅपटॉपसह घराचीही झडती घेण्यात आली. त्यानंतर 22 महिन्यांआधी आक्षेपार्ह मजकूर पेरण्यात आल्याचा धक्कादायक अहवाल मॅसेच्युसेट्सस्थित अर्सेनल डिजिटल या कंपनीनं प्रसिद्ध केला. या पार्श्वभूमीवर विल्सन यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
आपल्यासह इतर आरोपींविरोधातील कारवाईला स्थगिती देण्याची आणि या लॅपटॉपमधील माहितीत फेरफार केल्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्याची मागणी विल्सन यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावरही भाष्य केलं. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा निर्णय हा बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. आम्ही सर्वांशी चर्चा करणार आहोत. हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे आणि प्रमुख नेते एकत्र आहेत. त्यामुळं सरकारला कोणताही त्रास नाही असं ते आवर्जून म्हणाले.