नवी दिल्ली वृत्तसंस्था : आयएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रींग घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळून लावला आहे. पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्जाचा प्रस्ताव मांडला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला होता त्यामुळे नाकारण्यात आलेल्या जामीन अर्जाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालायने देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करु शकता असं सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर सक्तवसुली संचलनालयाकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. “प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा निर्माण करू शकतं. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे,” असे सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळताना स्पष्ट सांगितलं.
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन नाट्यमय पद्धतीने अटक केलं होत. तपस सुरु झाल्यापासूनच पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु दिल्ली न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीदेखील पी चिदंबरम यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.