नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटन हा कोरोना लशीच्या वापराला परवानगी देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनने फायझर व बायोएनटेकच्या लशीला वापरासाठी परवानगी दिली आहे. भारतीयांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे लशीचा जगातील सर्वांत पहिला डोस ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या हरी शुक्ला (वय 87) यांना दिला जाणार आहे. ब्रिटनमध्ये कोविड लसीकरण कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. लसीकरण मोहिमेत राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे.
हरी शुक्ला यांना या लसीकरणासंदर्भात फोनवरून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. याबाबत शुक्ला म्हणाले, लशीचे पहिले दोन डोस घेणे हे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लसीकरणासंदर्भात घोषणा करून एक मोठे पाऊल उचलले असल्याची भावना हरी शुक्ला यांनी लस घेण्याआधी व्यक्त केल्या आहेत. कोरोना व्हायरस विरोधातील या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लशीचे पहिले दोन डोस घेणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. मला आनंद आहे की, आम्ही हा साथीचा आजार संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही लस घेऊन मी आपले काम करत असल्याचा मला अभिमान आहे. मी जे काही करतो आहे, ते माझे कर्तव्य आहे. लसीकरण सुरू होणे हा एक फार मोठा दिलासा आहे, कारण हे एक सामान्य संकट नाही. मी घाबरलो आहे, असे नाही तर मी खूप उत्सुक असल्याचे शुक्ला म्हणाले.
ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच 80 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ही लस सर्वांत प्रथम देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून लशीच्या आठ लाख छोट्या बॉटल उपलब्ध होणार असून, सरकारने 4 कोटी बॉटलची मागणी नोंदवली आहे. त्यातून 2 कोटी लोकांना लस देता येईल, कारण लशीच्या दोन मात्रा देणे अपेक्षित आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना बळींची संख्या 61 हजारांवर पोहाेचली आहे.