नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी परकीय चलनाबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली. ३० ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनात १८.३ कोटी डॉलरची वाढ झाली. त्यामुळे चलन मालमत्ता ५६०.१७ अब्ज डॉलरवर पोहोचले. परकीय गंगाजळीत एकाच आठवड्यात ७.७७ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली असून, हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता ६.४०३ अब्ज डॉलरनं वाढून ५२४.७४२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलन मालमत्ता डॉलरमध्ये मोजण्यात येते. ६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील सुवर्ण भंडारात १.३२८ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे सुवर्ण भंडार ३७.५८७ अब्ज डॉलरवर गेला. देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मिळालेला विशेष विड्रॉवल अधिकार ७० लाख डॉलरवरून १.४४८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत जमा असलेली गंगाजळी ४.६७६ अब्ज डॉलरवर गेली आहे.
परकीय गंगाजळी वाढवणे म्हणजे नक्की काय ?
परकीय गंगाजळी वाढणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुचिन्ह मानलं जातं. जगभरात डॉलरच्या माध्यमातूनच व्यवहार केले जातात. परकीय गंगाजळीत बहुतांशपणे डॉलरचा समावेश असतो. परकीय गंगाजळीतील वाढीचा दुसरा अर्थ आपला देश आता जास्त आयात करू शकतो.