इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन – बाभुळगाव (ता.इंदापूर) येथे गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडात बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू सापडले असुन सदर पिल्लु हे बीबट्याचे असल्याबाबतची अफवा पसरल्याने सदर परिसरातील नागरीकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने बाभुळगाव व परिसरामध्ये खळबळ उडाली होती. मात्र वनविभाग अधिका-यांनी समक्ष पाहणी केली. ते मार्जार (मांजर)कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटी जातीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तेथील नागराकांनी सुटकेचा निश्वास सोडला.सदर पिलास वनविभागाने ताब्यात घेवून निसर्गात सोडले असल्याची माहीती इंदापूर वनपरिक्षेत्रअधिकारी राहुल काळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना दीली.
दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाभुळगाव येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊसाच्या फडात एक बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू आढळून आले.या संदर्भात त्यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी त्या पिल्लाचे छायाचित्र काढून ते वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याकडे पाठवले.काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना ही माहिती दिली. तसेच पूणे ग्रामिण पोलीस अधिक्षक यांनाही माहीती देण्यात आली.त्यानंतर वनसंरक्षक कार्यालयाच्या सुचनेनुसार इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी इंदापूरचे वनपाल राहुल गीते, बी.एस.खारतोडे व इतर स्टाफ बाभुळगाव येथे पाठवुन सदर प्राण्यांबाबत खातरजमा केली.
वनपाल व वनकर्मचारी यांनी रापडलेल्या प्राण्याची पाहणी केल्यानंतर सदरचे पिल्लू मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटी या जातीचे असल्याचे सांगीतल्याने बाभुळगाव परासरात बिबट्याचा सहवास असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाल्याने बीबट्याच्या भितीने धास्तावलेल्या बाभुळगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले की,सदरचे पिल्लू अत्यंत दुर्मिळ अश्या वाघाटी जातीचे आहे.वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या शेड्युल १ मध्ये वाघ, सिंह, हत्ती अश्या प्राण्याबरोबर वाघाटी जातीच्या प्राण्याचा समावेश आहे.इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या जातीचे पिल्लू सापडले आहे.त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे असुन बाभुळगावमध्ये बिबट्या नव्हे तर वाघाटी जातीचे पिल्लू सापडले आहे.त्यामुळे लोकांनी घाबरुन जावू नये,असे आवाहन राहुल काळे यांनी केले आहे.