बहुजननामा ऑनलाइन टीम : आपण जर नोकरी करत असाल आणि इनकम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लवकरच मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार येत्या अर्थसंकल्पाच्या आधी आयकरांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर विचार करीत आहे. उच्च उत्पन्नासाठी नवीन स्लॅब तयार करणे, कॉर्पोरेट टॅक्स व पर्सनल इनकम टॅक्स कमी करणे यांसारख्या प्रस्तावांचा विचार केला जात आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, ‘सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. कोणतेही पाऊल उचलण्याआधी त्याचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल आणि या निर्णयाचा काय परिणाम होईल हे पहावे लागेल.
पंतप्रधान किसान सन्मान निधीसारख्या योजनांच्या माध्यमातून थेट जनतेला अधिकाधिक पैसे मिळेल म्हणून इनकम टॅक्स कमी केला आहे. स्ट्रक्चरमध्ये झालेल्या कोणत्याही बदलाचा फायदा केवळ त्या 3 कोटी लोकांना होणार आहे जे इनकम टॅक्स वेळवर भरतात.थेट कराचा आढावा घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 10 % वैयक्तिक आयकर दराची शिफारस केली होती. दहा लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के तर 20 लाख रुपयांवरून 2 कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी 35 टक्के कर भरावा असा सूचक सल्ला त्यांनी दिला होता.
सध्याच्या आयकर माफी मर्यादेत बदल करण्याची शिफारस केलेली नसून वरच्या मर्यादेनुसार उत्पन्नावरील अधिभार काढून टाकण्याची शिफारसही त्यांनी केली. सध्या २.५ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख या दरम्यानच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने कर आकारला जातो, तर 5 ते 10 लाख या दरम्यानच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो. 50 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार 10 ते 37 टक्के अतिरिक्त अधिभार भरावा लागतो.
Visit : bahujannama.com