नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर अजूनही नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. एकीकडे संशोधन सुरूच आहे, तर एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता जानेवारीपर्यंत कोरोना लशीला मंजुरी मिळू शकते, असे समजत आहे. याबाबतची माहिती गुरुवारी दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
कोरोनाच्या लढाईमध्ये ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. वर्षाच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला कोरोना लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते, असे समजत आहे. सध्या भारतामध्ये 6 लशींवर काम सुरू आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक लशीच्या तिस-या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनने लशीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या फायझरला आपत्कालीन मंजुरी दिली आहे.
तिस-या टप्प्यातील चाचणी घेत असलेल्या लशींपैकी कोणत्याही एका लशीला मंजुरी मिळेल, असे चिन्हे आहेत. ही मंजुरी डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मिळेल, अशी शक्यता आहे. या लशीला मंजुरी मिळाल्यानंतर भारतामध्येही लशीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती डॉक्टर गुलेरिया यांनी दिली आहे.
ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस कोविशील्डची तिसर्या टप्प्यात चाचणी आंतरराष्ट्रीय स्तरावर समोर आली आहे. तसेच ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करत आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मागील आठवड्यामध्ये सांगितले की, कंपनी लवकरच आपत्कालीन मंजुरीची तयारी करत आहे.
लस अल्प मुदतीसाठी सुरक्षित आहे. सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हणता येईल की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. लशीची सुरक्षा आणि कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सध्या ही लस 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना दिलेली आहे. त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत, असे डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे, युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएन्टेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएन्टेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनलाय. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होणार आहे, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही बुधवारी रशियन अधिकार्यांना पुढच्या आठवड्यापासून ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.