नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. अशात मोदी सरकारने स्वस्त सोन्याची स्किम आणली आहे. 9 ते 13 सप्टेंबरदरम्यान सरकारी योजना सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) मध्ये स्वस्त सोनं मिळत आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत बाजारभावापेक्षा 1100 रुपये कमी किंमतीत सोनं खरेदी करू शकता. सध्या सोन्याची किंमत 40 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. या योजनेअंतर्गत 38900 रुपये प्रति दहा ग्रॅम सोनं मिळत आहे. सोबतच गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तु्म्हाला व्याजही मिळेल. याशिवाय ऑनलाईन खरेदी केल्यानंतर 50 रुपयांची अतिरीक्त सूटही मिळत आहे.
काय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम ?
सॉवरेन गोल्ड बॉन्डची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती. याचा हेतू सोन्याच्या मागणीत कमी आणण्याचा आणि सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत आर्थिक बचतीत वापरली जावी हा होता. घरातच सोनं खरेदी करून ठेवण्यापेक्षा तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक कराल तर तुम्ही टॅक्सही वाचवू शकता.
कुठून खरेदी कराल स्वस्त सोनं ?
सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफिस आणि एनएसई तसेच बीएसईद्वारे होते. तुम्ही यापैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन गोल्ड बॉन्ड स्किममध्ये सहभागी होऊ शकता. भारत बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडद्वारे मागील 3 दिवस 999 प्योरिटीवाल्या सोन्याच्या दिलेल्या किंमतीवर या बॉन्डची किंमत रुपयांमध्ये निश्चित होते.
50 रुपयांची अतिरीक्त सवलत
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, “ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट केल्यानंतर सरकारने निश्चित केलेल्या किंमतीवर भारत सरकारने 50 रुपये प्रतिग्रॅमची सवलतही आरबीआयसोबत सल्लामसलत केल्यानंतर दिली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची देय रक्कम प्रतिग्रॅम 50 रुपयांनी कमी असेल. म्हणजेच या गोल्ड बॉन्डची किंमत 3890 रुपये प्रतिग्रॅम आहे. जर ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्हाला 50 रुपये सूट मिळेल. म्हणजे याची किंमत प्रतिग्रॅम 3840 रुपये असेल.
सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे-
1) जास्त नफा- या स्किमनुसार सुरुवातीच्या गुंतणुकीवर 2.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल.
2) मोठी बचत- बॉन्डची किंमत सोन्याच्या किंमतीच्या अस्थिरतेवर अवलंबून असते. सोन्याच्या किंमतीतील घसरणीवर गोल्ड बॉन्ड नकारात्मक रिटर्न देते. या अस्थिरतेला कमी करण्यासाठी सरकार दीर्घ कालावधीचे गोल्ड बॉन्ड जारी करत आहे. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी 8 वर्षांचा असतो. परंतु तुम्ही पाच वर्षांनंतरही आपले पैसे काढून घेऊ शकता. पाच वर्षांनी पैसे काढल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्सदेखली लावला जात नाही.
3) घेऊ शकता कर्ज- गरज पडल्यास सोन्याच्या ऐवजी बँकेतून लोनही घेतलं जाऊ शकतं. गोल्ड बॉन्ड पेपर कर्जासाठी कॉलेटरलच्या रुपातही वापरले जाऊ शकतात. हे पोस्ट ऑफिसमधील नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट सारखं आहे.