मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचे संकट मोठे आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हजारो लोकांना कोरोना संसर्ग होत आहे. त्यानंतर आता तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तिहार तुरुंगातील क्रमांक दोनमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये छोटा राजनलाही कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या कैद्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तुरुंगातील इतर कैद्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. तसेच तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) न्यायालयाने जानेवारी महिन्यात कुख्यात गँगस्टर राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे 26 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण 2015 मधील आहे.