पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) चे विद्यार्थी हॉस्टेल शुल्कवाढी विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता हे आंदोलनाचे वारे एफटीआयआयमध्येही शिरले आहेत. एफटीआयआय’च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी’मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फीमध्ये होणारी दहा टक्के वाढ यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. याच असंतोषातून विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण चालू राहील, असा इशारा एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने दिला आहे.
एफटीआयआय च्या स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, एफटीआयआयमध्ये २०१३ नंतर दरवर्षी शैक्षणिक शुल्कामध्ये दहा टक्के वाढ करण्यात येत आहे. २०१३ बॅचचे वार्षिक शुल्क ५५३८० रुपये एवढे होते. मात्र आगामी २०२० बॅच साठी हेच शुल्क १ लाख १८ हजार ३२० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अचानक एवढी शुल्कवाढ करण्यात आली आहे. २०१८ पासून कोलकाता येथील सत्यजीत रे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट़्यूट आणि एफ टीआयआय पुणे या दोन्ही संस्था संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जे. ई. टी) राबवितात.
या वाढीमुळे सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. २०१५ मध्ये प्रवेश परीक्षा शुल्क १५०० रुपये एवढे होते. २०२० प्रवेश परीक्षेसाठी १०,००० एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्क वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील इच्छुक विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. फी वाढीबाबत विध्यार्थ्यानी शांततेच्या मार्गाने आवाहन करून सुद्धा व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी १० % शैक्षणिक शुल्क वाढ बंद करण्यात यावी आणि शुल्क कमी करण्यात यावे. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व तोपर्यंत संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जे ई टी) बंद करण्यात यावी अशा आमच्या मागण्या असून, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com