बहुजननामा ऑनलाइन टीम – झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार सुदेश कुमार महातो यांना जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या उत्तर प्रदेशातील सराईत गुंडाला मुंबई पोलिसांनी ( threatening to kill)जेरबंद केले आहे.
याप्रकरणी महातो यांचे खासगी सचिव महेंद्र कुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरुन झारखंड येथील गोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ ऑगस्ट रोजी महातो यांना फोन करुन आरोपीने १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास घरात घुसून गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी महातो यांना धमकी देणारा आरोपी मुंबईत असलेला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सलग दोन दिवस तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुल दिली आहे. तो मुळचा प्रतापगडचा रहिवासी असून झारखंडमध्ये त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करुन बलात्कार करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.