औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे. यासाठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाॅलिटीकल कट्टा चे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्याच पॉलिटिकल कट्ट्यात ‘सोशल मीडिया अॅण्ड इटस् आफ्टर इफेक्टस्’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. यात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, युवक काँग्रेसचे समर्थ हनुमंत पवार, भाजयुमोचे कार्यकर्ते मल्हार गंधे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अॅड. अभय टाकसाळ यांना अमंत्रित केले होते. निवेदकाची भूमिका ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी आयोजनामागील भूमिका मांडली.
आमदार जलील म्हणाले की, सोशल मीडियामुळे देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, येणाऱ्या काळात राजकारणात सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला. याचा गैरवापरही करण्यात आला असल्याचा आरोप केला.
आमची कोणती जात नाही, कोणता धर्म नाही ; पण संविधानाने घालून दिलेल्या संकेतांचे पालन करून सुदृढ लोकशाहीसाठी अभिव्यक्तीचे एक जबाबदार व्यासपीठ आम्ही तरुणांना उपलब्ध करून देत आहोत. यानंतरदेखील विविध विषयांवर पोलिटिकल कट्ट्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला डॉ. शुजा शाकीर, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. उल्हास उढाण, राजेश मुंढे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.