बहुजननामा ऑनलाइन टीम – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 1 लाख 1 रुपयांची देणगी दिली आहे. फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होत आहे. यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून निधी संकलन अभियानाचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी झाला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलन सुरु आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून 12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवले आहे.