नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नायलॉन मांजाने नाशिक येथे एका महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने एका १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरला गेला. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुन या विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले आहेत. आदित्य संतोष भारद्वाज (वय १७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आदित्य हा गोधनी परिसरात राहतो. तो दुचाकीवरुन क्लासला जात होता.
गोधनी – मानकापूर रोडवर नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला. दुचाकी वेगात असल्यामुळे या मांजामुळे त्याचा गळा कापला गेला आणि तो दुचाकीवरुन पडला. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्याला अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आदित्यचा गळा जास्त चिरला गेल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचविले. नाशिक येथे काही दिवसांपूर्वी गळ्यात मांजा अडकल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. सरकार ने चायनीज मांजावर बंदी घातली असतानाही सर्वत्र सर्रास या मांजाची विक्री होत असते.