नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचे ६ कोटी ७५ लाख ५६ हजार ९२५ रुग्ण आढळून आले आहेत, तर १५ लाख ५० हजार ५६२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जगात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोनाच्या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात पोहाेचली आहे, तर ब्रिटनने आजपासून सर्वसामान्यांना लस देण्यास सुरुवात केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संयुक्त राज्य अमेरिका या युरोपीय संघाकडून फायझर/बायोएनटेकच्या लशीला रोलआउट करत, या आजाराविरुद्ध एक मोहीम सुरू करण्याची माहिती दिली होती. आता राष्ट्रीय स्वास्थ सेवा (एनएचएस) च्या माध्यमातून नागरिकांना ही लस टोचण्यात येणार आहे.
फायझर/बायोएनटेकला ब्रिटनने ४० मिलियन लशीचे डोस पुरवण्याचे निर्देश दिले. प्रत्येक व्यक्तीस दोन डोसची गरज असणार आहे. २० मिलियन नागरिकांना लस पुरेशी ठरेल. जवळपास ८००,००० डोस पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वांत पूर्वी ही लस आरोग्य सेवकांना दिली जाणार आहे. त्यानंतर वृद्धांना लस दिली जाईल.
भारतात आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी त्यांचा अर्ज भारताच्या औषध महानियंत्रकाकडे (डीजीसीआय) दाखल केला आहे. हा परवाना मिळाल्यानंतर लशीच्या आपत्कालीन वापराचा मार्ग खुला होईल. तथापि, सिरम सोबत फायझरनेही कोरोना लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीचे उत्पादन ‘कोविशिल्ड’ नावाने केले असून, त्याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, की आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे २०२० संपण्याच्या पूर्वीच लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला आहे. या लशीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या कामास दिलेल्या पाठिंब्याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत.
तसेच पुढे त्यांनी सांगितलं, आमच्या कंपनीचे लक्ष कोविशिल्डची लस सर्वांत प्रथम भारतात उपलब्ध करून देण्याचे आहे. त्यानंतर जगातील अन्य देशांना पुरवठा करण्याचा विचार आहे.