बहुजननामा ऑनलाइन टीम – बेशसिस्त वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने मागिल वर्षी एक राज्य एक चलन योजना सुर केली. मात्र, ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता रोखीने दंड वसुल करण्याचा पर्याय खुला केला असल्याचे राज्य वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पुणे-मुंबई शहरात वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने वर्षभरापूर्वी ‘एक राज्य एक चलन’ योजना सुरू केली. मात्र, ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्याचे प्रमाण कमी असल्याने पुणे-मुंबईतील थकीत दंडाची रक्कम वाढत आहे. त्यामुळे आता राज्य वाहतूक विभागाने या दोन्ही शहरांतील वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाची वसुली ऑनलाइन पद्धतीसह रोखीने करण्याचे आदेश दिले आहेत.
सिटबेल्ट, विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणे, विना परवाना वाहने चालविणे, मोबाइलवर संभाषण यासह विविध प्रकारचे नियमभंग करण्याचे प्रमाण राज्यात वाढत आहे. वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी एक राज्य एक चलन (वन स्टेट वन चलन) ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. रोखीने पैसे घेण्याऐवजी नियमभंग करणाऱ्यांकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाइन दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील वाहतूक पोलिसांना ई-चलन यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. ई-चलन यंत्राचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.
मुंबईत वाहतुकीचा नियमभंग केलेल्या वाहनचालकाकडून पुण्यातही दंड वसूल करण्याची सुविधा या यंत्राद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित वाहनचालकाने केलेल्या नियमभंगाची माहिती, छायाचित्र त्वरित उपलब्ध होत असल्याने सुरुवातीला ई-चलन यंत्राद्वारे करण्यात आलेली कारवाई वेगात झाली. दरम्यान, रोख स्वरूपात मिळणाऱ्या नोटा काळजीपूर्वक हाताळाव्यात. मुखपट्टी, जंतुनाशकांचा वापर प्राधान्याने करावा, असे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.