पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीशी संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणार्या मुलाखती पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केलीय.
तसेच येत्या काही दिवसांत कॅस’चे कामकाज पूर्ण न झाल्यास विद्यापीठाच्या 9 जानेवारी आणि 10 जानेवारी 2021मध्ये होणार्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असाही इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने (स्पुक्टो) दिलाय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मार्च-2020 मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या ‘कॅस’च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतींना स्थगित दिलीय. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये मुलाखती घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावर येणार्या बंधनांमुळे त्यावेळीही ‘कॅस’च्या मुलाखती स्थगित केल्या होत्या.
त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 22 ते 28 डिसेंबर दरम्यान कॅस’ अंतर्गत 484 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे स्पष्ट केलं होते. परंतु पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे काही प्राध्यापकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जात आहेत, त्यामुळे अध्यापक संघटनेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केलीय. परंतु 8 जानेवारीपर्यंत ‘कॅस’ची प्रक्रिया पूर्ण न केल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
प्राध्यापकांच्या ‘कॅस’बाबत शासनाने आदेश दिले असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या कॅस’अंतर्गत मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या मंगळवारी झाल्या बैठकीमध्ये 9 जानेवारी आणि 10 जानेवारी 2021 दरम्यान होणार्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एम. फुक्टो.चे सचिव प्रा. एस. पी. लवांडे यांनी सांगितले आहे.