बहुजननामा ऑनलाइन टीम – अर्थसंकल्पात राज्यातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसेच, केंद्र सरकारने नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब असल्याचे म्हटले आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारले जाईल. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत दिल्याची माहिती देत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, केंद्र सरकारची राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 पूर्णपणे तयार असल्याची घोषणा करत यासाठी एकूण 1.10 लाख कोटीचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस केला आहे. त्याकरिता 18 हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर खर्च केले जाणार आहे. मेट्रोचे जाळे देशातील शहरांमध्ये पसरवण्यावर जोर दिला जाईल. यात कोच्ची, बंगळुरू, चेन्नई यांच्यासह महाराष्ट्रातल्या नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.