नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून सीबीडी परिसराची ओळख होती. यामुळे अनेक नामवंत कलाकार व इतर मान्यवर व्यक्तींनी या परिसरात घर घेणे पसंत केले आहे, परंतु मागील काही महिन्यांपासून सीबीडीची ओळख बदलू लागली आहे. या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.सीबीडी बेलापूरमधील बी टेन टाइप गृहनिर्माण सोसायटीमधील ११ घरांमध्ये दोन महिन्यांत चोरी झाल्याचे समोर आले आहे.
मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात सीबीडीमधील सेक्टर ३ मधील बी टेन टाइप इमारतीमध्ये राहणारे गजानन भंडारे हे ४ ऑक्टोबरला त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे कामोठे येथे त्यांची चौकशी करण्यासाठी गेले होते. सकाळी घरी आले असता, त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दागिने व १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे तुलना केली, तर हे दागिने जवळपास १५ लाख रुपये किंमत होते. या प्रकरणी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान फक्त भंडारे यांच्या घरामध्ये चोरी नाही तर त्या दिवशी एकूण तीन घरे फोडण्यात आली. त्यापूर्वीही तीन घरांमध्ये चोरी झाली होती. यानंतर, ११ नोव्हेंबरला पुन्हा तीन घरांमध्ये चोरी झाली. १ डिसेंबरला त्याच सोसायटीमध्ये २ घरांमध्ये चोरी झाली. जवळपास दोन महिन्यांत एकाच सोसायटीमध्ये तब्बल ११ घरांमध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच पद्धतीने चोरी झाली आहे. सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये काही फुटेजही सापडले आहे. मात्र चोरट्यांचा सुगावा पोलिसानं लागला नाही.
घरफोडीचे सत्र थांबत नसल्यामुळे व झालेल्या चोरीचा तपास लागत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्यामुळे चोरीचे सत्र थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
मुद्देमाल परत मिळावा
घरफोडीमध्ये ३० तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेली. या घटनेला दोन महिने झाले आहेत. चोरीच्या घटनेमुळे आर्थिक नुकसान झालेच, त्याचबरोबर परिवारातील सर्वांना मानसिक धक्काही बसला आहे. पोलिसांनी तपास लवकर करून मुद्देमाल परत द्यावा, तर मानसिक धक्क्यातून सावरणे शक्य होईल असे सिबीडीतील रहिवासी गजानन भंडारे यांनी सांगितले.
सीबीडी सेक्टर ३ मधील बी टेन टाइप वसाहतीमधील रहिवासी परिमंडळ एकचे उपआयुक्त, गुन्हे शाखेचे उपआयुक्त व आयुक्त बीपिनकुमार सिंग यांनाही साकडे घालणार असून परिसरातील चोरीच्या घटना घडू नये यासाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी करणार आहेत.