बहुजननामा ऑनलाईन – येथील टप्पा चौकात नाकाबंदी करुन अडविलेल्या चारचाकी वाहनातून २ लाख ८० हजाराच्या दारुसह ४ लाखाचे वा न मिळून ६ लाख ८० हजाराचा मुद्देमाल दि.६ ऑक्टोंबर रोजी रात्री भद्रावती पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.६ ऑक्टोंबरच्या रात्री एक फिक्कट निळ्या रंगाची इंडिका विस्टा कार नागपूरकडून चंद्रपूरकडे दारुची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी भद्रावतीच्या टप्पा चौकात नाकाबंदी केली.यावेळी सदर वर्णनाच्या एम.एच.०४, डी.वाय.१५४८ क्रमांकाच्या कारला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने समोर दुरवर कार नेऊन थांबवली व कारमधून उतरुन आपल्या सहका-यासह पळ काढला.
सदर कारची झडती घेतली असता मधल्या सीटवर आणि डिक्कीमध्ये ९० मि.लि.मापाच्या संत्रा राॅकेट देशी दारुच्या २८०० निपा २८ खर्ड्यांच्या पेट्यांमध्ये आढळून आल्या.या दारुची किंमत २ लाख ८० हजार रुपये आहे. ही सर्व दारु व गुन्ह्यात वापरलेली ४ लाख रुपये किंमतीची इंडिका विस्टा कार असा एकूण ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनीलसिंग पवार,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार,पोलिस शिपाई हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे यांनी केली.