पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बँकेतील निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणा-या आंतरराज्य टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता या कटाचे आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडील प्राप्त डेटामधील बँक खाती मुंबई, हरियाणा, चेन्नई व हैद्राबाद येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. 5 खात्यापैकी ज्या निष्क्रीय खात्यात 100 कोटी रुपये पडून आहेत, ते खाते हरियाणा येथील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आयसीआयसीआय आणि एचडीएफएस बँकेतील पाच निष्क्रिय खात्यातील 216 कोटी 29 लाख रुपये लंपास करण्याचा आरोपीचा कट होता. पण सायबर पोलिसांनी तो उधळून लावला आहे. देशभरातील नागरिकांच्या बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवून त्याची विक्री करून आर्थिक फसवणूक करण्याची तयारी आरोपीनी केली होती. ज्या बँक खात्यातून आरोपी पैसे इतरत्र वळविणारे होते त्या मोठ्या व्यावसायिक कंपनीचे 5 खातेधारकांना पुणे पोलीसाच्या सायबर गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.19 ) पत्र पाठवून संबंधित बँक खात्याबाबतच्या माहितीची विचारणा केली आहे.
दरम्यान या गुन्ह्याची मास्टर माईंड अनना मोडक हिच्यासह 11 ओरापींना अटक केली आहे. अन्य आरोपीच्या शोधासाठी हैद्राबाद, सुरत, मुंबई, लातूर, औरंगाबाद याठिकाणी पुणे पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. अटक केलेल्या आरोपींची कार्यालये व घराची झाडाझडती घेतली जात आहे. यावेळी लॅपटॉप, हार्डडिस्क, मोबाईल, पेनड्राईव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला असून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे.