संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून गुगल पे, फोन पे द्वारे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे बनावट खाते बंद करुन गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.
सायबर चोरट्यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. या फेसबुक अकाऊंटवरुन १ व २ मार्चच्या दरम्यान रात्री त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे द्वारे पैशांची मागणी केली. फेसबुक पेजवर बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री थोरात यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी गुगल पे व फोन पे द्वारे पैसे मागितल्याचे स्क्रीन शॉटही पोलिसांना दिले आहेत. कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहे. हे खाते त्वरीत बंद करुन तपास करावा, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.