अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – Ahmednagar Crime News | राज्यात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने दारुच्या नशेत पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून घर पेटवून दिले. यामध्ये होरपळून तिघींचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सुनील गोरख लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार आरोपी सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी सुनील लांडगे याने पत्नी आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनीलच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांना मदत करता आली नाही.
दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.