बहुजननामा ऑनलाइन टीम –राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरीही आज एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर निनावी फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तसाच फोन कॉल आज शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आला. दोघांच्याही घरातील लँडलाइन फोनवर विदेशातून अज्ञात व्यक्तीने कॉल केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून तातडीने पोलीस तपास सरु करण्यात आला आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरी धमकीचे फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे ? खरंच दाऊद गँगशी या व्यक्तीची लिंक आहे का ? की यामागे आणखी कुणाचा हात आहे, याचा उलगडा पोलीस तपासानंतर होईल. तूर्त धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेतली जात आहे. मातोश्री निवासस्थानासोबतच शरद पवार यांचे सिल्व्हर ओक निवासस्थान आणि अनिल देशमुख याच्या निवासस्थानालाही अधिक सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.