बहुजननामा ऑनलाइन टीम – बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यातील विविध ऑडिओ व्हायरल झाल्या आहेत.
एक कार्यकर्ता कथित मंत्र्याला फोन करून सांगतो आहे की, आत्महत्येचे वेड तिच्या डोक्यातून काढून टाका. आत्महत्या पर्याय नाही. कितीतरी पोरींची ती आयडल आहे. ती आत्महत्या करतेय म्हणजे अवघड आहे. तुम्ही तिला समजवा. त्यावर मंत्री म्हणतात, तिला एवढं स्पष्ट बोलूनही तिच्या डोक्यात तोच विषय आहे, त्यावर कार्यकर्त्यांनी तिला ट्रीटमेंट करूया असं म्हटलं होतं. तर ती ट्रीटमेंट करायला तयार आहे परंतु त्यानंतर आत्महत्या करेन असं ती तरुणी सांगत असल्याचं कार्यकर्त्यानं मंत्र्यांला सांगितलं.
तुम्ही सांगा तिच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार काढा असं कार्यकर्ता मंत्र्याला विनंती करत आहे. तिनं विचारलं तू का सांगितलं, यावर त्या कार्यकर्त्यानं सांगितलं गरजेचं आहे. आत्महत्या पर्याय नाही. हे तिच्या डोक्यातून काढा असं वारंवार कार्यकर्ता कथित मंत्र्याला सांगत आहे अशी ऑडिओ क्लीप सोशल मीडिया व्हायरल होताना दिसत आहे.
इतकंच नाही तर मुलीच्या आत्महत्येनंतर कथित मंत्री आणि कार्यकर्ता यांच्यात पुन्हा संवाद झाला. ही ऑडिओ क्लीप बंजारा भाषेत आहे. आत्महत्येनंतर अरुण नावाचा कार्यकर्ता तिथंच उपस्थित होता. मंत्री त्या अरुणला दरवाजा तोड आणि तिचा मोबाईल काढून घे असं सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. फोन त्यांच्या हाती लागू देऊ नको. त्यावर कार्यकर्ता मी पुन्हा फोन करतो फोन सुरूच ठेवा असं कथित मंत्र्याला म्हणत आहे.
सदर 22 वर्षीय तरुणीनं ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. भाजपच्या महिला आघाडीनं या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लीपमधील आवाज तपासण्यासाठी त्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत.