नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून घरात डांबून ठेवत तिच्यावर सलग 18 दिवस बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पिडीत मुलीची सुटका केली आहे.
सूर्या जांभूळकर (19, रा.आजरी-माजरी ) असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.
यशोधरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आजीसोबत सक्करदरा येथे राहते. आरोपी हा तिच्या आजीला नेहमी मदत करायचा त्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे- जाणे होते. त्यामुळे आरोपीची मुलीवर नजर होती. गेल्या 18 दिवसांपूर्वी मुलीची आजी आजारी होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले होते. आरोपीने नेमके हीच संधी साधून मुलीला आजीला बघायला हॉस्पिटलमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने घाईघाईत तयारी करून त्याच्या दुचाकीवर बसली. त्याने थेट दुचाकी आजरी माजरी परिसराकडे नेली. त्यावेळी मुलीने विचारले असता आरोपीने आजीच्या उपचारासाठी पैसे आणायचे असल्याचे सांगितले. त्याने कळमनाजवळ असलेल्या एका खेड्यात नेले. तेथे एका घरात कोंडून ठेवून तिच्यावर गेल्या 18 दिवसापासून बलात्कार करत होता. आरोपी बाहेर गेल्यानंतर एके दिवशी मुलीने त्याच्याच मोबाईलवरून आजीला फोन करून घडलेली हकिगत सांगितली. वृद्ध आजीने पोलिसांना माहिती दिली. मात्र सक्करदरा पोलीस कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त होते. घटनेचे गांभीर्य ओळखून यशोधरानगरचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवले. आरोपी बिनाकी जवळील पुलाखाली उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनुसार पोलिसांनी तिथे धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आरोपीना इतर कोणी मदत केली का याचा तपास पोलीस करत आहेत.